प्रतिनिधी, मुंबई :‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली. कायम शिवसेनेचा द्वेष केला. अशा पवारांच्या कच्छपी आज उद्धव ठाकरे लागले आहेत. शरद पवार शिवसेनेचा पराकोटीचा द्वेष करतात. शिवसेनेचे नुकसान करण्याची कोणतीच संधी पवारांनी सोडली नाही’, अशी टीका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली. ‘२०१७ मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे राज्य येण्याची शक्यता असताना सेना सत्तेत असेल तर आम्ही भाजपबरोबर येणार नाही, असे पवारांनी स्पष्ट सांगितले होते’, असा गौप्यस्फोटही यावेळी केसरकर यांनी केला.‘महाराष्ट्रातील जनतेने आणि विशेषतः शिवसैनिकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत’, असे ते म्हणाले. ‘१९८९च्या दरम्यान दिना बामा पाटील यांच्या मुलुंड येथील प्रचारसभेत पवारांनी बाळासाहेबांवर व्यक्तिगत टीका केली होती. त्याच मैदानात बाळासाहेबांनी सात दिवसांत सभा लावून पवारांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर मनोहर जोशी यांनी मध्यस्थी केली व या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचे नाही, असे ठरले. बाळासाहेबांनी शेवटपर्यंत हा शब्द पाळला, पवारांनी मात्र शब्द तर मोडलाच’, असा आरोप करत शिवसेनेमध्ये चार वेळा फूट पाडली अशी टीकाही केसरकर यांनी यावेळी केली. ‘शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु त्यांनी आतापर्यंत काय भूमिका घेतल्या आणि त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. राज्याचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, परंतु आपले कौंटुबिक राजकारण शाबूत राहिले पाहिजे, या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे’, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
मराठवाड्यात ५६ टक्के मतदान, ९० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, कुठे किती झालं मतदान?
‘…म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली’
‘भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित बैठका होऊन मंत्री, पालकमंत्री ठरले होते. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे गेला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घ्यायला माझा विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सत्तेमध्ये असलीच पाहिजे. तशी ठाम भूमिका घेतली नसती तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सरकार महाराष्ट्रात आले असते. भाजपबरोबर वाटाघाटी करण्यासाठी शरद पवार यांनी पुरेसा वेळ असतानाही पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लागवट लागू झाली’, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.