शिरूर लोकसभेला बहिष्काराचे ग्रहण, ग्रामस्थ मतदान न करण्यावर ठाम, कारण काय?

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : शिरूरच्या तळेगाव तालुक्यातील ढमढेरे जवळ असणाऱ्या भैरवनाथनगर येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ५० वर्षांपासून वस्तीत सुविधांची वाणवा असून याबाबत नागरिकांना नुसते आश्वासनांचे गाजर दाखवून मतं घेतली जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थेच. परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचाच पवित्रा घेतला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

भैरवनाथनगर येथील ग्रामस्थांनी ‘लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार’ अशा मथळ्याचा एक बॅनर लावून बहिष्कार जाहीर केला आहे. बॅनरवरील मजकूर असा आहे की, समस्त ग्रामस्थ भैरवनाथनगर यांच्याकडून सर्व लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत स्थानिक सोयी-सुविधा पुरविण्यासाठीचे निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटून विनंती करुनही त्याची कोणीही दखल घेतली गेली नाही. गेल्या ५० वर्षांपासून आम्हा ग्रामस्थांना गृहीत धरून आपण पैसे फेकले की निवडून येऊ शकतो, असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. आम्ही जे निवेदने दिलेली आहेत. त्यांना सर्वांनी केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे. एकप्रकारे येथील ग्रामस्थांना सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांनी वाळीत टाकण्याचे काम केले आहे. यामुळे ग्रामस्थांनी मिळून आगामी लोकसभा व भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तरी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने आपल्या पक्षाचा झेंडा घेऊन येऊ नये. अन्यथा कार्यकर्त्यांसमोर नेत्याचा अपमान केला जाईल, असा सज्जड इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता… भरसभेत अमोल कोल्हेंचे अजितदादांना चॅलेंज
मतदानापूर्वी राजकीय पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने आणि त्यावर होणारा अंमल यात तफावत असल्याचे वारंवार निदर्शनास येत असते. यावरुन विविध गावांनी चक्क मतदानाकडे पाठ फिरवल्याच्या अनेक बातम्या देखील यंदा समोर आल्या. यातच शिरुर मतदारसंघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला भैरवनाथनगर मधून ही बाब समोर आल्याने आता पुढाऱ्यांना घाम फुटणार आहे.
Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघांत उद्या मतदान
दरम्यान, शिरूरचे तहसीलदार म्हस्के यांनी नागरिकांना भेट देऊन सांगितले की, ‘लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण प्रशासनाला सहकार्य करावे. ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. आचारसंहिता असल्याने काही निधी मिळत नसतो. भैरवनाथ नगरच्या ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. तरी मी संबंधित कागदपत्रे पाहून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’ तरीही भैरवनाथ नगरच्या ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.