आयुष्याच्या या वळणावर मी अमोलसोबत नाही याची मला खंत वाटते असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असेही त्यांनी वक्तव्य केल्याने शिवसेनेत खळबळ उडाल्याचे समजते.
गजानन कीर्तिकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. अमोल खासदारकीची निवडणूक लढतो म्हणजे निवडून आल्यावर खासदारच होणार ना, असेही ते म्हणाले. ही निवडणूक अटीतटीची असून दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे. जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोण हे दिसून येईल. दीड वर्षांपूर्वी मी शिंदेंसोबत गेलो. त्यावेळी माझे कुटुंबीय विरोध करत होते आणि मी एक वेगळे मत मांडत होतो. आता मी एकटा पडलो आहे, अशी खंत कीर्तिकरांनी व्यक्त केली. अमोलच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळत असताना मी त्याच्यासोबत नव्हतो याची मला खंत वाटते असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ज्याप्रकारे उमेदवार दिले आहेत ते पाहता महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. रवींद्र वायकर यांना माझ्यामुळे फायदा व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. अमोल कीर्तिकर हे निवडून आल्यानंतर भाजप-शिवसेनेत जातील असे वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना कीर्तिकर म्हणाले की, अमोल हा ठाकरेंना सोडून जाणार नाही. त्याला जायचेच असते तर त्याचवेळी आमच्यासोबत शिंदेंकडे आला असता, असे ते म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
एकनाथ शिंदे यांनी त्याला स्वतः आमंत्रण दिले होते. मात्र माझे वडील वेगळी भूमिका घेणार असतील तर त्याला माझा काहीही विरोध नाही. परंतु मी ठाकरेंना सोडणार नाही असेही त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर अमोल हा ठाकरेंना सोडून जाणार नाही. या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.