शिंदे गटातील चौघांनीच खासदारकी टिकवली, ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?

मुंबई : साधारण दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने सर्वात मोठं बंड पाहिलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या १८ खासदारांपैकी १३ जणांनी त्यांची साथ सोडली. आमदार, नगरसेवक, नेते, पदाधिकारी एकामागून एक साथ सोडून जाऊ लागले. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात पोहोचलेल्या लढ्यात उद्धव ठाकरेंना पक्ष आणि अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण गमवावं लागलं. त्यानंतर पूर्ण ताकदीनिशी उद्धव ठाकरे मैदानात उतरले. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी आपला झंझावात दाखवून दिला.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरेसेनेच्या नेत्यांनी ‘गद्दारी’ करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या. त्याचा परिणाम बंडानंतर झालेल्या पहिल्या मोठ्या निवडणुकीत पाहायला मिळाला. बंडाला दोन वर्ष लोटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचं दिसत आहे. कारण मुंबईत ठाकरेंनी लढलेल्या चारपैकी चार जागा जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्रातील २१ पैकी १० जागांवर आघाडी मिळवली आहे.

विशेष म्हणजे, महायुतीत १५ जागा लढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जनतेच्या कोर्टात शिंदेंना झटका बसला. कारण सुपुत्र श्रीकांत शिंदेंसह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश आलं आहे. त्यात बुलढाणा, मावळ आणि हातकणंगलेचा समावेश आहे. तर ठाकरेंकडे असलेली ठाण्याची जागा खेचून आणत शिंदेंनी होमग्राऊण्डवर विजय मिळवला. याशिवाय औरंगाबादमधून विद्यमान खासदार जलील यांच्यासह ठाकरेंच्या उमेदवाराला पराभूत करण्यात शिवसेनेला यश आलं आहे. तर नाशिक, शिर्डी, कोल्हापूर आणि मुंबईतील तीन जागा शिंदेंनी गमावल्या आहेत. तर रामटेक, हिंगोली आणि यवतमाळ वाशीमही पराभवाच्या छायेत आहेत.
110708357

विजयी (खासदारकी टिकवली)

बुलडाणा – प्रतापराव जाधव
कल्याण – श्रीकांत शिंदे
मावळ – श्रीरंग बारणे
हातकणंगले – धैर्यशील माने

औरंगाबाद – संदिपान भुमरे (आमदार)
ठाणे – नरेश म्हस्के (माजी महापौर)

पराभूत

नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
मुंबई दक्षिण – यामिनी जाधव (आमदार)
मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर (आमदार)
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

पराभवाच्या वाटेवर

रामटेक – कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना तिकीट, पराभवाच्या छायेत, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयाच्या वाटेवर
हिंगोली – हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कोहळीकर यांना तिकीट, पराभवाच्या छायेत, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या वाटेवर
यवतमाळ-वाशिम – भावना गवळी यांच्याऐवजी हिंगोलीचे मावळते खासदार हेमंत पाटील (त्यांचाही पत्ता कट) यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट, पराभवाच्या छायेत, ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना विजयी आघाडी
मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्याने रवींद्र वायकर यांना तिकीट मिळालं होतं.