राजेश शहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०२२ मध्ये शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शहांनी शिंदेंना साथ दिली. शहा त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेटवर्किंगसाठी ओळखले जातात. पालघर आणि आसपासच्या भागात असलेल्या विविध समाजांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. एप्रिल २०२३ मध्ये शिंदेंनी शहांची उपनेतेपदी नियुक्ती केली. त्याआधी ते पालघर जिल्हाप्रमुख होते. त्यावेळी शिवसेना एकसंध होती.
शहा व्यवसायिक कुटुंबातून येतात. पालघरमधील एमआयडीसी आणि औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भंगार व्यवसायावर त्यांचं वर्चस्व आहे. याशिवाय ते बांधकाम साहित्यदेखील पुरवतात. व्यवस्थापन, संपर्क आणि वाटाघाटी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच त्यांनी उपनेतेपदापर्यंत मजल मारली आहे.
शहा २००० सालाच्या आधीपासून राजकारणात सक्रिय होते. ठाणे आणि आसपासच्या भागात ते काम करत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदेंकडे ठाणे आणि पालघरची जबाबदारी सोपवली. त्यानंतर शहा आणि शिंदे एकमेकांच्या अधिक जवळ आले. पालघरमधला शिंदेंचा उजवा हात अशी शहांची ओळख आहे.
‘एका औद्योगिक कंपनीत दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेलं पोस्टर फाडण्यात आलं. शहा जिल्हाप्रमुख असल्यानं त्यांनी यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं. पण त्यांनी काहीच केलं नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याची तक्रार पक्ष नेतृत्त्वाकडे केली. पण शिंदेंचा माणूस अशी ओळख असलेल्या शहांवर कोणतीच कारवाई झाली नाही,’ असा किस्सा शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितला.
शिवसेनेच्या दोन्ही गटातील पदाधिकारी शहांच्या व्यवस्थापकीय, वाटाघाटी कौशल्य आणि आर्थिक ताकदीवर बोलतात. पालघरच्या केळवे-माहीम परिसरात त्यांचं घर आहे. याशिवाय बोरिवलीतही त्यांचं निवासस्थान आहे. पालघरमधील सगळ्याच समुदायांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत. ते लोकनेते नाहीत. पण राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, आंबेडकर जयंती यासारख्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. स्थानिक आयोजकांना ते मदत करतात. स्थानिक पदाधिकारी, संस्था आणि समुदायांच्या नेत्यांसोबत लहान बैठका घेण्याचं काम ते करतात.
‘एप्रिल २०२३ मध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी कुंदन संखे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामागे संघटनात्मक कारणं होती. पण त्यांनी शहांची नियुक्ती पालघरच्या उपनेतेपदी केली. शहांना साईड लाईन करण्यात येणार नसल्याचा संदेश शिंदेंनी वर्षभरापूर्वीच दिला,’ असं शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
अपघातावेळी कार चालवत असलेला राजेश यांचा मुलगा मिहीर त्यांच्या बोरिवलीतील घरात राहतो. त्याला पालघरमध्ये फारसं कोणी ओळखत नाही. ‘मिहीर कधीकधी पालघरमध्ये येतो. कुटुंबाच्या व्यवसायासाठी तो पालघरला येतो. अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांप्रमाणे तो राजकारणात फारसा सक्रिय नाही. पण तो वडिलांसोबत असतो. तो बोरिवलीत राहत असल्यानं आम्हाला त्याच्या शैक्षणिक आणि अन्य पार्श्वभूमीची फारशी कल्पना नाही,’ अशी माहिती पालघरमधील एका नेत्यानं दिली.