दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा गेली काही दिवस सुरू आहेत. एका शिष्टमंडळाने यापूर्वी गोविंदबागेत शरद पवार यांचीही यासाठी भेट घेत युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते करत आहेत. शरद पवार यांनी मात्र या विषयी अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. अद्याप जागावाटप ठरलेले नाही. मविआच्या बैठकीत जागा वाटप सुरुवातीला होईल. त्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरेल, असे शरद पवार म्हणाले.
युगेंद्रला उमेदवारी? पवार घराण्यातील सदस्यांच्या सावध प्रतिक्रिया
दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी याविषयी प्रतिक्रिया दिली होती. कार्यकर्ते भावना व्यक्त करत असतात. पक्ष नेतृत्व यासंबंधीचा अंतिम निर्णय घेईल, असे आमदार पवार म्हणाले तर गुरुवारी बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, युगेंद्र गेली तीन-चार वर्षे बारामतीत काम करतो आहे. परंतु अजून मविआचे जागा वाटप ठरलेले नाही. राज्यातील कोणत्या जागा कोणाकडे हे पहिल्यांदा वरिष्ठ पातळीवर ठरेल. त्यानंतर कुठे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षाची समिती घेईल.
बारामतीमधून सुप्रियांना ४८ हजारांचं लीड, दादांसमोर चॅलेंज
दरम्यान, युगेंद्र यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर बारामतीची निवडणूक मोठी चुरशीची होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना येथे लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. बारामतीतून सुळे यांना ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले. युगेंद्र यांची उमेदवारी जाहीर झाली तर अजित पवार हे बारामतीतच अडकून पडतील.