आज सकाळी गोविंदबाग येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवार बोलत होते. या निवडणुकीत आम्ही ३१ जागा जिंकल्या. विधानसभेच्या मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास १५५ ठिकाणी आमच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. विधानसभेतही लोकांचा असाच मुड दिसेल असा आपल्याला विश्वास आहे, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलणं झालंय, लवकरच भेटून चर्चा करणार
पवार पुढे म्हणाले, दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दुष्काळ दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद झाला. या दौऱ्यामुळे लोकांचे सुखदुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आपण दौरा करणार असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी काही गोष्टी यामध्ये असून काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. आता मुख्यमंत्र्यांना बैठक घ्या असे सांगितले असून मी फोनवरून देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
युगेंद्र पवारांना तिकीट देणार का?
युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का असे विचारल्यानंतर पवार म्हणाले, हा निर्णय इथे घ्यायची वेळ नाही. यासाठी पक्षाची बैठक घ्यावी लागते. त्यात निर्णय होत असतात. विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे काही उमेदवार म्हणून तयारी असते, ती केलेली नाही. आता आमची निवडणूक लढविण्याची तयारी आहे, त्या कामात लक्ष घातले आहे, बाकीचे निर्णय नंतर घेऊ.
आरक्षण हा केंद्र सरकारशी संबंधित विषय
ओबीसी आरक्षणासंदर्भात शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारशी संबंधित हा प्रश्न आहे. काही दुरुस्त्या केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. केंद्र सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सामाजिक तणाव होणार नाही याची खबरदारी आणि जबाबदारी ही सगळ्यांची असली, तरी केंद्राला आता बघ्याची भूमिका घेता येणार नाही.
भुजबळ ‘तिकडे’ नाराज आहेत, पवार म्हणाले….
छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नाराज आहेत, या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे मला माहीत नाही. त्यांच्याकडून आमच्याशी कुठलाही संपर्क नाही.