शरद पवारांचा बारामतीत तळ, फासे टाकायला सुरूवात, काटेवाडीत झलक दिसली, दादांची वाट बिकट करणार!

अक्षय आढाव, बारामती (पुणे) : लोकसभा निवडणुकीत विजयाचा चौफेर गुलाल उधळल्यानंतर विधानसभेच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत अधिकाधिक पाय रोवायला सुरूवात केली आहे. महिन्याभरात शरद पवार दुसऱ्यांदा बारामतीच्या दौऱ्यावर असून निवडणुकीत प्रभाव पाडू शकणाऱ्या तालुक्यातील गावांना ते भेटी देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या संवादात विधानसभेला आपल्याला चित्र पालटायचे आहे. जसे लोकसभेला काम केले तसेच काम विधानसभेला करायचे आहे, असे आवाहन करून बारामतीत आता भाकरी फिरविण्याची वेळ असल्याचे ते जनतेला थेट सुचवताहेत. त्यांच्या संपूर्ण दौऱ्यात विधानसभेची तयारी करणारे बारामतीचे नवे दादा अर्थात युगेंद्र पवार साथीला आहेत. बुधवारी मुळगावी काटेवाडीत बोलताना अजित पवार यांच्यासोबतीच्या स्थानिक नेत्यांना मलिदागँग संबोधून आपल्याला स्वच्छ चारित्र्याची तरूण मुले राजकारणात आणायची आहेत, असे म्हणून त्यांनी युगेंद्र पवार हेच विधानसभेचे उमेदवार असतील, असे अप्रत्यक्ष संकेतच दिले. बारामतीमधील वाढते दौरे, गावोगावी जाऊन अजितदादांची करत असलेली घेरेबंदी आणि युगेंद्र पवार यांना लोकांसमोर नेऊन जनमानसांतील त्यांचे स्थान उंचाविण्याचे प्रयत्न पाहता अजित पवार यांना विधानसभेची निवडणूक तितकिशी सोपी असणार नाही, अशी चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात आहे.लोकसभा निकालानंतर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शरद पवार जोरकसपणे सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे. मागील दोन आठवड्यापूर्वीच शरद पवारांनी बारामती तालुक्याचा तीन दिवसीय दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटी देण्यासोबतच दुष्काळी परिस्थितीचा देखील आढावा घेतला होता. आता १८ जूनपासून शरद पवार यांनी पुन्हा बारामतीत तळ ठोकला असून आपल्या होमपीचवर विधानसभेला प्रतिस्पर्ध्यांनी बॅटिंग करू नये, यासाठी कामाला लागले आहेत. त्याची झलक त्यांनी मुळगावी काटेवाडीत दाखवली.
Sharad Pawar : निवडणुकीत विजयी तुतारी वाजल्यानंतर पहिल्यांदाच गावात पाऊल, काटेवाडीकरांकडून शरद पवार यांचे दणक्यात स्वागत

शरद पवार काटेवाडीत काय म्हणाले?

लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची येईल, कारखान्याची येईल. प्रत्येक ठिकाणी योग्य निकाल घेण्यासाठी मतदान करायचे आणि लोकांच्या हिताचे राजकारण करायचे, हे सूत्र घेऊन आपल्याला काम करायचे आहे. याच्यासाठी तुम्हा लोकांची एकी हवी आहे. काही लोक दिसत नाहीत मी गेले दोन दिवस बारामती तालुक्यात हिंडतोय. माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे मी गेलो तर अनेक लोक त्या ठिकाणी येतात, सगळे नेते असतात. आता या निवडणुकीत मी जातोय सगळीकडे नव्या पिढीची, गरिबांची, सामान्य लोकांची गर्दी दिसते पण नेते दिसत नाही कुठे. नेते कुठे गेले कळत नाही, असे सांगत मालिका गँग बाजूला झाली असा निशाणा अजित पवार यांचे न घेता शरद पवार यांनी साधला.
बारामतीची जनता माझी साथ सोडणार नाही असं मला माझं मन सांगायचं : शरद पवार

मलिदा गँगला धडा शिकवायचा

आपल्याला दुरुस्ती करायची आहे, लोकांच्या जीवनात फरक करायचा आहे आणि त्यासाठी स्वच्छ व्यवहार याच्याशी तडजोड करायची नाही. जिथे मलिदा गॅंगचे काही उद्योग असतील तिथे त्यांची जागा दाखवून देऊ आणि परिसर हा दुरुस्त करू, एवढंच काम करायचंय, त्यासाठी तुम्ही जागरूक रहा.
मुलगा किंवा बायको पक्ष सोडून जाणार नाही, याची दादांना खात्री म्हणून काकीला खासदारकी दिली, रोहित पवारांची टोलेबाजी

कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार

आता काही गोष्टींकडे मला लक्ष द्यावे लागेल. आपल्याकडे कारखानदारी आहे. छत्रपती कारखाना सुरू करण्यामध्ये त्या काळात काटेवाडीच्या अनेकांचा हातभार होता. माझे वडील त्यामध्ये होते, आप्पासाहेब पवार यांचे योगदान होते आणि ही कारखानदारी चांगली चालली होती. आता काय झाले मला माहिती नाही, आता कोण मार्गदर्शन करतं याच्या खोलात जावं लागेल, असा टोलाही लगावत इथल्या कारखान्याची निवडणूक किती हे तुमच्या संसाराची निवडणूक आहे. तुमच्या संसाराची निवडणूक असेल त्याच्यामध्ये लक्ष घालावेच लागेल, असे ते म्हणाले.
Sharad Pawar in Baramati: विधानसभेसाठीही शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; थोरल्या पवारांचे दौरे धाकल्या पवारांचे टेन्शन वाढवणार

स्वच्छ, चारित्र्यसंपन्न राजकारणाची सुरूवात करायची

कुठलीही निवडणूक आली त्यासाठी जागरूक रहा. तुमच्या जागरुकीच्या जोरावर आपण चित्र बदलू आणि ते चित्र बदलायचे आहे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात बदल करायचा आहे, महाराष्ट्रात राज्य आणायचाय. आणि महाराष्ट्रात राज्य आणून जे काही लोकांचे सुख दुःख आहे त्यातून लोकांची सुटका करायची, असा निश्चय पवार यांनी बोलून दाखवली.

स्वच्छ, चारित्र्यसंपन्न राजकारणाची समाजकारणाची सुरुवात करायची आहे. एवढेच मी या ठिकाणी सांगतो, असे पवार म्हणत असताना युगेंद्र यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. नेते कुठेही गेले तरी सामान्य लोक कुठे गेले नाही हे सुप्रियाच्या निवडणुकीत मी बघितलं. पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनी सुद्धा आपलं काम चोख केलं त्यामुळे या ठिकाणी यश आलं त्याच रस्त्याने जाण्याचा निर्धार आपण करूया, पाऊलं टाकूया मी तुमच्या बरोबर आहे, असे ठामपणे सांगून शरद पवार यांनी विधानसभेच्या अनुषंगाने फासे टाकायला सुरूवात केली आहे.

काकांचे आव्हान पुतण्या कसे पेलणार?

शरद पवार यांनी जर युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली तर शरद पवार लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूक हाती घेऊन अजित पवार यांची विधानसभेत जायची वाट बिकट करणार, यात शंका नाही. त्यामुळे शरद पवार यांचे आव्हान अजित पवार कसे पेलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.