खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली अतुल देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात आता शरद पवारांना तगडा उमेदवार मिळाला आहे. मोहिते पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ९६ हजार मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांना ६३ हजार मते मिळाली. परंतु अतुल देशमुख यांनी याच निवडणुकीत अपक्ष उमेदवार असूनही ५३ हजारांपेक्षा अधिक मते मिळविली. अतुल देशमुख हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते. त्यामुळे सुरेश गोरे यांना त्याचा फटका बसला. मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन केले आणि राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील निवडून आले.
पुढे सुरेश गोरे यांचे कोरोना काळात निधन झाले. मोहिते पाटलांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून अतुल देशमुख यांच्याकडे पाहिले जात आहे. अजित पवार भाजप बरोबर जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतला. त्यामुळे भाजपमध्ये राहून मोहितेंच्या नेतृत्वाखाली काम करणे अतुल देशमुख यांना अस्वस्थ करू लागल्याने देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शरद पवारांची तुतारी हाती घेतली. डॉ. अमोल कोल्हे यांनी आखलेला डाव खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात यशस्वी झाला. या मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांना तब्बल ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले.
आता विधानसभा निवडणुकीचे वेध सगळ्यांनाच लागले आहे. खेड-आळंदी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे बाबाजी काळे हे देखील तयारी करत आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुधीर मुंगसे यांचे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचा एक अनुभव आणि दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या अतुल देशमुख यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. आगामी काळात या मतदारसंघात अजित पवारांचे दिलीप मोहिते पाटील आणि शरद पवारांचे अतुल देशमुख अशी लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.