शंकराचार्यांना भेटल्यानंतर नरेंद्र मोदींनी काय केलं? स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मुंबई: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, स्वामीजींना पाहताच पंतप्रधानांनी एक खास गोष्ट केली. नंतर जेव्हा पत्रकारांनी शंकराचार्यांना पंतप्रधानांच्या भेटीचा अनुभव विचारला तेव्हा त्यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला ते हिंदू कसे? भेटीनंतर शंकराचार्यांचे शिंदे-भाजपवर शरसंधान
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नानंतर आयोजित आशीर्वाद समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्योतिर्मथ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची भेट चर्चेत आहे. मुंबईतील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यावेळी शंकराचार्यांनी मोदींना आशीर्वाद म्हणून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. यावेळी इतर शंकराचार्यही उपस्थित होते. मोदींनी एक एक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि मोदी यांचा व्हिडिओ चर्चेत आहे. यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी माध्यमांना मोदींच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतल्यावर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की हो, मी त्यांना भेटलो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना नमस्कार केला. मीही त्यांना आशीर्वाद दिला. आमचा नियम असा आहे की जो कोणी आमच्याकडे येईल, आम्ही त्याला आशीर्वाद देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे शत्रू अजिबात नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. आम्ही नेहमी पंतप्रधानांच्या हिताबद्दल बोलतो. तसेच नेहमी त्यांच्या कल्याणाविषयी बोलतो. त्यांच्याकडून चुका झाल्या तरी आम्ही त्यांना सांगतो, असं अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले आहेत.

दरम्यान याआधी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकवेळी शंकराचार्यांनी मोदींवर टीका केली होती. मंदिराचे उद्घाटन धर्माशी सुसंगत नसल्याचे म्हटले होते. यानंतर याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. आजच्या प्रतिक्रियेत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नरेंद्र मोदींना शत्रू मानत नसून त्यांचं हितचिंतक असल्याचे वक्तव्य करत या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे. तसेच अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली आहे.