‘ही माझी नाही, तर ही काँग्रेस पक्षाची बंडखोरी आहे,’ अशी भूमिका घेऊन रिंगणात विशाल पाटील यांनी सांगलीतील लढत रंगतदार केली आहे.
गेल्या वेळीही ते रिंगणात होते. मात्र, त्या वेळी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे आणि सध्याचे भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुमारे तीन लाख मते घेतली होती. विशाल पाटील यांना ३.४४ लाख मते मिळाली आणि संजय पाटील सुमारे सव्वापाच लाख मते मिळवून विजयी झाले होते.
यंदा विशाल पाटील यांना प्रचारादरम्यान मोठी सहानुभूती मिळाल्याचे चित्र दिसले. पलूसचे आमदार विश्वजित कदम यांनी सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांना सक्रिय पाठिंबा दिला. मात्र, पक्षादेश आणि आघाडीचे बंधन यामुळे नाईलाजाने त्यांना महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जाऊन चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात भाग घ्यावा लागला. अर्थात, कदम यांचा पाठिंबा मतांमध्ये परिवर्तित होणार का, याबाबत साशंकताच आहे.
भाजपचा राजीनामा देऊन जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले. मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामा देऊन विशाल यांना पाठिंबा दिला. सांगली हा मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे सध्या तरी विशाल पाटील यांनी आपण लढतीत प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.
शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना फारसा राजकीय, सामाजिक वारसा नसला तरी ते ‘डबल महाराष्ट्र केसरी’ आहेत. बैलगाडी शर्यती आणि लष्करी जवानांसाठी महारक्तदान शिबिर घेऊन त्यांनी राजकीय मैदानात उडी घेतली आहे. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आदी नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, जतचे आमदार विक्रम सावंत, सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या नेत्यांनी कार्यकर्त्यांची फळी प्रचारात उतरवली आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील, विधान परिषदेतील आमदार अरुण लाड, ‘राष्ट्रवादी’चे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनीही चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभांमध्ये उपस्थित राहून एकी दाखवून दिली. त्यामुळे धीम्या गतीने का असेना, पण चंद्रहार पाटील यांचा प्रचार व्यापक झाल्याचे दिसले.
खासदार संजय पाटील यांना भाजपने तिसऱ्यांदा रिंगणात उतरवले असून, त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या आहेत. फडणवीस यांच्या मध्यस्थीने पलूस-कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नुकताच झाला. दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा नेटाने प्रचार करण्याचे वचन दिल्याचे भाजपकडून सांगितले जाते. सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ आणि मिरजेत भाजपचे सुरेश खाडे आमदार आहेत. या दोघांखेरीज खानापूरचे शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांचा गट, विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुतीच्या प्रचारात जोर लावला आहे. या शिवाय प्रत्येक छोट्या-मोठ्या गावात, शहरात संजय पाटील यांचा वैयक्तिक गट जोमाने काम करीत आहे.
या मतदारसंघातील विजयाच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे असल्याचे जिल्ह्यात बोलले जाते. त्यामुळे त्यांची भूमिकादेखील या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
विधानसभानिहाय चित्र
सांगली (भाजप), मिरज (भाजप), विटा (शिवसेना शिंदे गट), पलूस (काँग्रेस), तासगाव-कवठे महांकाळ (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), जत (काँग्रेस)
एकूण मतदार १८,६८,१७४
पुरुष : ९,५३,०२४
स्त्री : ९,१५,०२६