संजय राऊत काय म्हणाले?
नाना पटोले हे मोठे नेते आहेत. ते यापेक्षा मोठे नेते व्हावेत. ते आमचे मित्र आहेत. मुंबईचा पदवीधर मतदारसंघ गेली 40 वर्षे शिवसेना जिंकते आहे. ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे. या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.
कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आहे. आमची चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे, असं नाही. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. किशोर जैन यांची कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे. पण नाशिकची जागा त्यांनी मागे घ्यावी असं काल बैठकीत ठरल्याचं राऊत म्हणाले. विषय संपलेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, विधानसभेत मोठा भाऊ असल्याच्या पटोलेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, की भाजपाने सुद्धा प्रयत्न केला होता, पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं. एकमेकांच्या मदतीने आम्ही लोकसभा जिंकलो आहोत. आमच्यासमोर धनुष्यबाणाचे 13 उमेदवार उभे केले गेले त्याचा फटका आम्हाला बसला. उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेचे नंबर एकच टार्गेट होतं. सगळ्यात जास्त संघर्ष हा शिवसेनेच्या वाट्याला आला. आम्ही मोठ्या मनाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं, असंही राऊत म्हणाले.
उद्या आम्हाला चार जागा मिळाल्या तरी आम्ही शेफारून बोललो नसतो. सर्वांची मेहनत आहे. 158 जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला सावधगिरीने पावलं उचलावं लागतील. आमची अपेक्षा 180 ची आहे. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
आम्ही लोकसभेला 30-31 जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं. फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे, तेव्हा त्यांनी कोणी थांबवणार नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.