विमानात प्रवासी महिलेचा धिंगाणा, जागेवरून वाद घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

मुंबई : इंडिगो एअरलाइन्सच्या वाराणसी ते मुंबई प्रवासादरम्यान जागेवरून आणि पाण्यावरून प्रवासी महिलेने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. शिवीगाळ, आरडाओरड करणाऱ्या या महिलेने केबिन क्रू सोबतही वाद घातला. याप्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडिगोच्या वाराणसी-मुंबई विमानाला सोमवारी काही कारणास्तव विलंब झाला. या विमानात १७५ प्रवासी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर वंदना मिश्रा या महिलेने जागा बदलून देण्याची विनंती केली. तेव्हा दुसऱ्या सीटवर बसणाऱ्या महिलेने जागा बदलण्यास नकार दिला. विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यावर वंदना या वॉशरूमला गेल्या आणि काही वेळाने बाहेर येताच त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जागा बदल, विमानाला झालेला विलंब आणि पिण्यासाठी देण्यात आलेले पाणी यावरून वंदना यांनी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.

कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. मात्र वंदना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यांनी वैमानिकाला देखील शिवीगाळ केली. वंदना यांनी शिस्त मोडली आणि रेड कार्डचे उल्लंघन केले. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यावर सर्वांना धमकी देखील त्यांनी दिली. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी वंदना यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.