विरोधी पक्ष आक्रमक
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झालेले दिसून आले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.
महाविकास आघाडीचं गाजर आंदोलन
सत्ताधारी महायुतीचे नेते पोस्टर घेऊन पायऱ्यांवर उभे होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भरतशेठ गोगावले यांना ‘ही आमची जागा आहे’ असे म्हणत निदर्शने करण्यावरुन डिवचले. तर सचिन अहिर यांनी गाजर देत प्रतिकात्मक आंदोलन केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
विरोधकांची घोषणाबाजी
महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे. तर गुजरात महाराष्ट्राच्या पुढे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकासदर २.५० टक्क्यांपेक्षा जास्त घटला, सेवा क्षेत्रातील विकासदर ४.२ टक्क्यांनी घटला. “अधोगती ‘महायुती’ सरकार”, “अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता”, “अब की बार, महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार”, “अर्थसंकल्प कोणासाठी? सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी”, “घटनाबाह्य सरकारचा अजब कारनामा”, “शेजारी तुपाशी, महाराष्ट्र उपाशी”, “शेतकरी झाला कर्जबाजारी, सरकार वसुलीत बेजारी” असे फलक हातात घेत “महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे” अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले.