बहुजन विकास आघाडीच्या ३ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका आमदाराचं मतदान बाकी आहे. दुपारी ३ च्या सुमारास म्हणजेच मतदान संपण्यास केवळ तास उरलेला असताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर त्यांच्या आमदारांसह विधिमंडळात पोहोचले. त्यावेळी विधिमंडळाच्या दारातच त्यांची भेट मिलिंद नार्वेकरांशी झाली. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आहेत. ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील दुपारी तीनच्या सुमारास विधिमंडळात मतदानास पोहोचले. विधिमंडळाच्या प्रवेशद्वारात त्यांची मिलिंद नार्वेकरांशी भेट झाली. ठाकूर आणि नार्वेकर यांच्यात काही वेळ संवाद झाला. त्यानंतर ठाकूर त्यांच्या आमदारांसह विधिमंडळात गेले.
पुढच्या काही मिनिटांमध्ये बविआचे तिन्ही आमदार भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात गेले. या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळपासूनच उपस्थित आहेत. ठाकूर यांनी भाजपच्या कार्यालयात जाऊन फडणवीसांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे बविआच्या ३ आमदारांची मतं महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढल्यानं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षाच्या नेत्यांनी ठाकूर यांच्या गाठीभेटी घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती. दोनच दिवसांपूर्वी ठाकूर आणि फडणवीस यांच्यात एक बैठक झाली होती. त्यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याच पुढाकारानं ही भेट झाली होती.