उद्या १२ जुलैला विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
“विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात हॉटेस पॉलिटिक्स सुरु आहे. अजित पवार गटाचे आमदार तसेच भाजप आणि शिंदे गटाचे आमदारही हॉटेलवर मुक्कासाठी आहेत. परंतु काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे असे कोणतेही नियोजन नाही. केवळ काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला आम्हाला मार्गदर्शन करतील, तिथे स्नेहभोजन पार पडेल” असे गोरंट्याल म्हणाले.
“आमच्या काँग्रेस पक्षात ३ ते ४ डाऊटफुल आमदार आहेत. ते कोणते आमदार आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे. पक्ष त्यांची व्यवस्था करेल”, असे वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर ते चार फुटीर आमदार कोण? याची चर्चा विधान मंडळ परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे मागील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षातील आमदार फुटले असल्याने यावेळीही पुनरावृत्ती होते की काय, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
आपले आमदार उतर पक्षांच्या गळाला लागू नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी खरबदारी घेतली आहे. त्याचमुळे विविध पक्षांकडून आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवण्यात आले आहे. मात्र पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने हे सर्व विधिमंडळात कामकाजानिमित्त एकत्रित येत असल्याने तिथे कानगोष्टी होणारच आहेत. त्यामुळे ‘फुटीर आमदारांना’ रोखण्यात पक्ष कसे यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण आहेत?
भाजप-पंकजा मुंडे,परिणय फुके,सदाभाऊ खोत,अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर
शिवसेना (शिंदे गट) -कृपाल तुमाने आणि भावना गवळी
शिवसेना (ठाकरे गट)-मिलिंद नार्वेकर
काँग्रेस-प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार-जयंत पाटील (शेकाप)