विधान परिषद निवडणुकीत दगाफटक्याची भीती, भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, पण अंबानींमुळे बोंब

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी महायुती सावध झाली आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यामुळे त्यांना हॉटेल मिळण्यास मुश्किल झाले आहे.

मुकेश अंबानींचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत रंगला आहे. त्यासाठी देश-विदेशातून व्हीआयपी पाहुणे मायानगरीत आले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबई परिसरातील बहुतांश फाईव्ह स्टार हॉटेल्स बूक झाली आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना उच्चतारांकित हॉटेल्स मिळणं दुरापास्त झालं आहे. अखेर भाजप आणि शिवसेना आमदारांची स्वतंत्र सोय करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महायुतीला फाटाफुटीची भीती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही ठाकरेंनी पक्षाचे सचिव आणि राईट हँड मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर नार्वेकरांची भिस्त आहेच. मात्र महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. नार्वेकर आणि पाटील यांच्यात मुख्य चुरस मानली जात असली, तरी महाविकास आघाडीतील एकी आणि नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंध पाहता दोन्ही उमेदवार निवडले जाण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. उलटपक्षी गुप्त मतदानात भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी या तीन पक्षांपैकी काही आमदार ‘लक्ष्मी’दर्शनाने फुटण्याची भीती पक्षश्रेष्ठींना आहे.

फाईव्ह स्टार ट्रीटमेंट

अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वच आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. भाजप बुधवारपासूनच, तर राष्ट्रवादी गुरुवार-शुक्रवार आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवणार आहे. त्यांचा पत्ता कदाचित गोपनीयही ठेवला जाऊ शकतो. मात्र फाईव्ह स्टार ट्रीटमेंटमुळे आमदारांची चंगळ आहे.
MLC Elections : ठाकरे गटाची काँग्रेससोबत बैठक, नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव, भाजपही सावध

महाविकास आघाडी चिल्ल

दुसरीकडे, महाविकास आघाडी रिलॅक्स दिसत आहे. कारण काँग्रेसने गुरुवारी पक्षाच्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले असले, तरी त्यात आमदारांना मतदानासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. ना शरद पवार गटाने आमदारांसाठी वेगळी व्यवस्था केली, ना ठाकरे गटाने. परंतु ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने सामना चुरशीचा होणार हे निश्चित आहे.