विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार? तीन नावं चर्चेत, कोणाची वर्णी लागणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १७ जागा लढवल्या. त्यापैकी १३ जागांवर पक्षाला यश मिळालं. तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. तिरंगी लढतीत बाजी मारणाऱ्या पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं यंदा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता.

लोकसभा निवडणुकीत १७ पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार न देणाऱ्या काँग्रेसनं विधान परिषदेसाठी मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्ष नेतृत्त्वाकडे यासंदर्भात आपली भूमिका मांडली. राज्यात मुस्लिम जनतेनं लोकसभेत काँग्रेसला चांगली साथ दिली. त्याची परतफेड म्हणून समाजातील नेत्याला विधान परिषदेवर संधी द्यायला हवी, अशी भूमिका राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली. नेतृत्त्वानं या मागणीला हिरवा कंदिल दिला आहे.
मविआचा मोठा निर्णय! विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न; ‘इंडिया’चा फॉर्म्युला रिपीट करणार
विधान परिषदेच्या एकूण ९ जागा रिक्त होत आहेत. काँग्रेसकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. काँग्रेसचे नेते वजाहत मिर्झा यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांची वर्णी लागू शकते. मिर्झा यांच्यासह माजी आमदार मुझफ्फर हुसेन आणि नसीम खान यांची नावं चर्चेत आहेत.

मुझफ्फर हुसेन मीरारोड भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक, उपमहापौर आहेत. २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१६ या कालावधीत ते विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहेत. २०१९ मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेले नसीम खान चांदिवलीचे माजी आमदार आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते उत्सुक होते.