शिंदेसेनेचे नेते भाजपच्या राज्य नेतृत्त्वाविरोधात उघड भूमिका घेऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केलेली असताना शिंदेसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. टाईम्स नाऊनं सुत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेसेनेत भाजपविरोधात असलेला संताप वाढला आहे. ‘लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आमच्या पक्षात अतिहस्तक्षेप केला. जागावाटप, उमेदवारांची निवड यात भाजपनं नको तितकं लक्ष घातलं. मुंबई दक्षिण, नाशिक, हिंगोली, यवतमाळ या जागा भाजपला लढवायच्या होत्या. त्यावर त्यांनी दावा केला. पण शिंदेंनी या जागा मिळवल्या. भाजपमुळे जागावाटप, उमेदवारी निवडीत बराच वेळ खर्ची पडला,’ असा नाराजीचा सूर शिंदेसेनेत होता.
जागावाटपातील पेच, उमेदवारी जाहीर करण्यास झालेला उशीर याचा फटका पक्षाला बसला. भाजपनं बराच हस्तक्षेप केला. विधानसभेला असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. लोकसभेतील आमचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विधानसभेला शिंदेचं महायुतीचं नेतृत्त्व करतील आणि त्यावेळी आम्ही कोणताही हस्तक्षेप सहन करणार नाही, अशी शिंदेसेनेच्या नेत्यांची भूमिका आहे. भाजपच्या जागा घटल्यानं आता शिंदेसेनेच्या नेत्यांनी थेट भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे.
शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांनी भाजपविरोधात उघड भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणांमुळे आलेला अतिआत्मविश्वास नडला. जागावाटपाच्या चर्चेत जो तो सर्व्हे दाखवत होता. त्यामुळे जागावाटपास उशीर झाला, असं म्हणत शिरसाटांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. तर रामटेकमधून माझं तिकीट कापण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आग्रही होते. महायुतीच्या ४२ जागा निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. पण तुमानेंना तिकीट दिलं तर माझी जबाबदारी ४१ जागा निवडून आणण्याची असेल, असं बावनकुळेंनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांना सांगितलं होतं, असा दावा तुमानेंनी केला. रामटेकमधून माझं तिकीट कापण्यासाठी बावनकुळेंनी शिंदेंवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप तुमानेंनी केला.