विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका लोकांना सांगणार

पुणे (बारामती) : बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी बारामतीत आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ”आम्ही विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, ती भूमिका पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यभरातील जनतेला सांगणार आहोत”, असं त्यांनी सांगितले.”विधानसभेचे रणशिंग फुंकणार अशी मीडियामध्ये चर्चा आहे. तर काय चर्चा करायची हा मीडियाचा अधिकार आहे. तो माझा अधिकार नाही. आम्हाला आमची भूमिका सांगायची सुरुवात करायची होती. आम्ही सर्व एकत्र बसलो आणि सर्वांनी सांगितलं की, बारामतीतून सुरुवात करू म्हणून बारामतीला आज मेळावा घेतला आहे. आम्ही राज्यभर त्यासंदर्भातील मिळावे घेणार आहोत”, असंही अजित दादा यावेळी म्हणाले आहेत.
Congress: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसशी गद्दारी, फुटलेले ते ७ आमदार कोण? नावं समोर

”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र दौरावर आले होते. महत्त्वाच्या विकास कामांचे त्यांनी भूमिपूजन व उद्घाटने केले. जवळपास तीन हजार कोटींची ही कामे आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या बाबतीत मी महाराष्ट्राला नक्कीच मदत करेल. परंतु जशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईची ओळख आहे. तशीच जगाची देखील ती आर्थिक राजधानी करण्याबद्दलचा एक विचार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी आमच्याकडून महाराष्ट्रातील योजनांची देखील माहिती घेतली”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या ‘क्लीन चिट’ला नव्यानं आव्हान देण्यात आले आहे. अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ जुलैला सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एप्रिलमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा रिपोर्ट अजित पवार यांना मोठा दिलासा मानला जात होता.