विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ? मुंबई युनिव्हर्सिटीतील धक्कादायक प्रकार

रोहन टिल्लू, मुंबई : एकीकडे मुंबई विद्यापीठ १६८वा स्थापना दिन साजरा करत असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे, बुधवारी रात्री विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील कँटीनमध्ये दिलेल्या नूडल्समध्ये झुरळ सापडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. तर काही विद्यार्थी जाणूनबुजून हे प्रकार करत असून यामागे विद्यापीठाच्या बदनामीचा डाव आहे, अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे महाराष्ट्राचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना विचारले असता, संबंधित अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
– विद्यार्थ्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे धाव

– प्रशासन म्हणते, हा विद्यापीठाला बदनाम करण्याचा डाव

– सखोल चौकशी होणार
कोकणकरासांठी खूशखबर; गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन, बुकिंग कधी सुरु होणार? वाचा सविस्तर…

या वर्षातील चौथी घटना

कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतिगृहातील भोजनालयातील जेवणात झुरळ, डास किंवा माश्या सापडण्याचे प्रकार येथे वरचेवर घडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या वर्षात १३ फेब्रुवारी, ६ मे, २६ मे या दिवशीही विद्यार्थ्यांच्या ताटात डास, माशी किंवा झुरळ सापडले होते. त्या वेळीही या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे महापालिकेच्या निरीक्षकांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित कँटीनची तपासणी केली होती. हे कँटीन चालवण्यासाठीचा परवाना दाखवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा शेराही या वेळी मारण्यात आला.

… म्हणून विद्यार्थी बोलत नाहीत!

तुमच्या जेवणाच्या ताटात वारंवार डास, झुरळ, प्लास्टिक, रबर बँड, माशी, आदी गोष्टी आढळल्यास तुम्ही काय करायचे? अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार करून, संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधूनही या तक्रारींबाबत काहीच कार्यवाही होत नाही. बुधवारी ज्या विद्यार्थ्याच्या ताटात हे झुरळ सापडले, तो पुढे येऊन तक्रार करायला तयार नव्हता. कारण त्याच्या विभागाच्या प्रमुखाकडे वसतिगृहाच्या अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. आपण बोललो, तर परीक्षेतील गुणांवर किंवा पीएचडीच्या प्रबंधावर परिणाम होईल, अशी भीती अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. म्हणूनच ते विद्यार्थी पुढे येत नाही, असे सिद्धांत मालवणकर, विद्यार्थी

‘विद्यापीठाच्या बदनामीचे षडयंत्र’

याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार म्हणजे विद्यापीठाच्या बदनामीचे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली. एकच विद्यार्थी याबाबत तक्रारी करतो. इतर कोणत्याही विद्यार्थ्याच्या काहीच तक्रारी नाहीत. हा विद्यार्थी जेवणाचे ताट त्याच्या खोलीत घेऊन जातो आणि त्यानंतर बाहेर येऊन जेवणात काहीबाही सापडल्याची तक्रार होते, असे काही जण सांगतात. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याची चौकशी होईल, असेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. तर, वसतिगृहाचे वॉर्डन संतोष गिते यांच्याशी संपर्क साधला असता, असा काही प्रकार घडल्याचे माहीत नाही, असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.