राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंचं निकटवर्तीय असलेल्या रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वायकरांवर केला होता.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. त्यांनी वायकरांना दिलासा दिला आहे. ‘वायकरांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेनं त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,’ असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे.
वायकरांना दिलासा मिळाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यामुळे मी कोणतीही कमेंट करणार नाही, असं उत्तर सोमय्यांनी दिलं. वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटनंतर विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. आता केवळ दाऊदला क्लीन चिट देणं बाकी असल्याचा टोला ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. भाजपनं विरोधकांविरोधात ईडी, सीबीआयचे खटले केले. त्या खटल्यांना घाबरुन वायकर पळून गेले. आता त्यांना दिलासा मिळाला आहे. पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा गैरसमजातून खटला दाखल करु शकते का? त्यांच्याच प्रमुखांविरोधात खटला दाखल करायला हवा, अशी टीका राऊत यांनी केली.