ओळखीने किंवा वशिल्याने येणाऱ्या रुग्णांनाच केवळ योग्य आणि वेळेत उपचार मिळतात. अन्य रुग्णांना मात्र, केस पेपर काढण्यापासून ते औषधे मिळविण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वशिल्यासाठी फोन करणाऱ्यांमध्ये राजकीय पदाधिकारी, महापालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांचा वरचा क्रमांक लागतो.
व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण
पिंपरी-चिंचवड शहरात संत तुकारामनगर येथे महापालिकेचे सुसज्ज असे ‘वायसीएम’ रुग्णालय आहे. दररोज येथे दोन हजार ते अडीच हजार रुग्ण येतात. त्यामध्ये अन्य शहरांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. किरकोळ आजारांपासून ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया माफक दरात येथे होत असल्याने राज्यातील गोरगरीब रुग्णांना ‘वायसीएम’चा मोठा आधार वाटतो.
सामान्य रुग्णांची अवस्था वाईट
उपचारादरम्यान रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्या रुग्णांची ओळख आहे, ज्यांचा वशिला आहे, ज्या रुग्णांसाठी ‘मान्यवरां’चे फोन येतात, त्यांना ‘व्हीआयपी’ उपचार दिले जातात. उर्वरितांना मात्र, तासनतास रांगेत उभे राहावे लागते. एका कागदपत्रासाठी दिवसभर हेलपाटे मारावे लागतात. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टर कधी येतील, याची वेळ नाही. रुग्णाला नेमके कोणते उपचार दिले जात आहेत, रुग्णाची परस्थिती कशी आहे, रुग्ण बरा होण्यासाठी किती दिवस लागतील , याबाबतची माहितीही नातेवाइकांना दिली जात नाही.
औषधांसाठी रुग्णांची धावाधाव
‘वायसीएम’मध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारचे उपाचार रुग्णालयामार्फतच दिले जातात. मात्र, अनेक रुग्णांना डॉक्टर बाहेरून औषधे आणण्यासाठी पाठवितात. संबंधित औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत, बाहेरच्या मेडिकलमध्ये मिळतील, असे सांगून त्यांना पिटाळे जाते. याचा मोठा आर्थिक फटका रुग्णांना बसतो. रात्रीच्या वेळी येणाऱ्या रुग्णांना अनेकदा पुण्यात ससून रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे तेथील यंत्रणेवर ताण येते. त्यामुळे ‘वायसीएम’मध्ये सर्व सुविधा आणि तज्ज्ञ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
‘कट प्रॅक्टिस’ला उधाण
‘वायसीएम’मध्ये रक्ताच्या चाचण्या, एक्स रे, सोनोग्राफ्री, सिटी स्कॅन, ‘एमआरआय’ आदी विविध चाचण्या होतात. या सर्व चाचण्यांसाठीची उपकरणे रुग्णालयात उपलब्ध आहेत. असे असूनही चाचण्यांसाठी रुग्णांना बाहेरील लॅब मध्ये पाठिवले जाते. लॅबचालक आणि रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याने रुग्णांना चाचण्यांसाठी बाहेर पाठिवले जात असल्याचे आरोप रुग्ण आणि नातेवाइक करीत आहेत.
शस्त्रक्रियेच्या साहित्याचे ‘आउटसोर्सिंग’
रुग्णालयात दररोज विविध शस्त्रक्रिया होतात. या शस्त्रक्रियांसाठी विविध साहित्याची गरज असते. हे साहित्य बाहेरून आणावे लागेल, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. शस्त्रक्रियेचे साहित्य पुरविणारे अनेक ठेकेदार आहेत. संबंधित रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकाला संबंधित साहित्य कमी किमतीत देण्याचे आमिष ठेकेदारांकडून दाखवले जाते. याशिवाय शस्त्रक्रियेचे साहित्य आपल्याकडूनच घेतले जावे, यासाठी ठेकेदार रुग्णांच्या नातेवाइकांवर दबावही टाकतात.
रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे उपलब्ध असून, सर्व चाचण्याही केल्या जातात. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी असून, लवकरच त्या सोडविण्यात येतील. रुग्णाला वशिला किंवा इतर कारणांमुळे व्हीआयपी उपचार दिले जात नाहीत. प्रत्येक रुग्णावर गरजेप्रमाणे उपचार केले जातात.- डॉ. अभय दादेवार, विभागप्रमुख, ‘वायसीएम’
‘वायसीएम’ एका दृष्टिक्षेपात
खाटा
७५०
विभाग
१५ ते १६
‘ओपीडी’तील रुग्ण
दररोज २००० ते २५००
डॉक्टर
३५०
दररोज शस्त्रक्रिया
५०