महाविकास आघाडीतर्फे आगामी लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या. त्यात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासह उत्तर मुंबई या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी देण्यात येते, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात तर्कविर्तक वर्तविण्यात येत असतानाच हायकमांडने गुरुवारी संध्याकाळी उत्तर मध्य मुंबईसाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाला पसंती दिली.
पक्षाच्या या निर्णयामुळे गायकवाड समर्थकांसह मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मात्र काही दिवसांपासून दक्षिण मध्य मुंबईच्या निवडणुकीच्या प्रचारात सामील होऊन गायकवाड यांनी या चर्चेलाही पूर्णविराम दिला.
नसीम खान नाराज; स्टार प्रचारकपदाचा राजीनामा
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान उत्सुक होते. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने त्यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि काँग्रेसच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी दिल्लीत हायकंमाडकडे पाठविला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘कॉँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कमजोर परिस्थितीतही पक्षाने दिलेल्या सर्व आदेशाचे कठोर पालन मी करत आलो आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती. ती पण मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याने याबाबत नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्दच नसतात’, अशी नाराजी त्यांनी पक्षाला दिलेल्या पत्रात नमूद केली.