‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष; शेअर बाजारातील गुंतवणुकीवर पाचपट नफा, सायबर चोरट्यांकडून ५७ लाखांना गंडा

प्रतिनिधी, पुणे : गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा, मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती, अर्ध वेळ नोकरीचे आमिष, पर्समध्ये अमली पदार्थ सापडल्याने कारवाई करण्याची भीती… आदी विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी शहरातील नऊ जणांची ५७ लाख ८६ हजार ७२ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकाच दिवशी हडपसर, कोंढवा, लोणीकंद, विमानतळ, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीसह ‘आयटी अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठाला गंडा

‘तुमच्या बँक खात्यावर फसवणुकीच्या रकमेतील काही रक्कम पाठविण्यात आली आहे,’ असे खोटे सांगून सायबर चोरट्यांनी ससाणेनगर येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख ४३ हजार ६३ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना २८ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यानच्या काळात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने तक्रारदाराला संपर्क करून तुमच्या बँक खात्यातील व्यवहारांची चौकशी करावी लागेल, असे सांगून, त्यांची फसवणूक केली आहे.मतदान केंद्र असणार सर्व सुविधांनी सज्ज; मनपातर्फे प्रत्येक केंद्रावर पाळणाघर, पाणीपुरवठा व्यवस्था

‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने गंडा


‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून दररोज पाच हजार कमाविण्याचे अमिष दाखवून सायबर चोरट्याने कोंढव्यातील एका तरुणाची सहा लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ३४ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ३० मार्च ते २६ एप्रिलदरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदाराला संपर्क करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून दररोज पाच हजार कमवता येतील, असे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळे ‘टास्क’ करायला लावून तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. त्यानंतर ‘प्रीपेड टास्क’ देऊन सहा लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली.

नफ्याच्या आमिषाने गंडा

मगरपट्टा येथील एका तरुणीला शेअर बाजारात पाचपट नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तीन लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली. गुंतवणुकीचे आमिष दाखवून वाघोली येथील २९ वर्षीय तरुणाची तीन लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

फसवणुकीच्या अन्य घटना

– नार्कोटिक्स विभागात गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून सायबर चोरट्याने शेवाळवाडी येथील एका व्यक्तीच्या खात्यातून १६ लाख ४० हजार १५१ रुपये परस्पर काढून घेतले.

– शेअर बाजारातील गुंतवणुकीवर नफा होईल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोंढवा बुद्रुक येथील एका व्यक्तीची सात लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

– विमाननगर येथील व्यक्तीची गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाख ७७ हजार ६८८ रुपयांची फसवणूक केली.

– ‘प्रीपेड टास्क’च्या आमिषाने कोंढव्यातील साईबाबानगर येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीची तीन लाख दोन हजार रुपयांची फसवणूक.

– पार्सलमध्ये ड्रग असल्याचे सांगून ३० वर्षीय तरुणीची ४३ हजारांची फसवणूक.