आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ओम सुनील भालेराव या १८ वर्षीय तरुणाचा चारचाकीने उडवल्याने मृत्यू झाला होता. कळंबमध्ये राहणारं भालेराव हे शेतकरी कुटुंब… ओम हा त्याच्या आई वडिलांना एकटाच होता. बारावी झाल्यानंतर त्याने पुढील शिक्षण न घेता शेतीकडे वळला. घरातील सर्वांचा ओम हा लाडका होता. गेल्या वर्षीच शाळा सोडून तो व्यवसायाकडे वळला होता. ट्रॅक्टरचा व्यवसाय तो करत होता. त्याला अजून एक ट्रॅक्टर घेण्याची इच्छा होती मात्र सध्या ट्रॅक्टरची आवश्यकता नाही, गरज पडेल तेव्हा नक्की घेऊ, असे वडिलांनी सांगितल्यावर ओमने त्यांचे म्हणणे ऐकले.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते हा त्याच्या फॉर्च्यूनर गाडीने (क्रमांक एम एच १४ के जे ७५५७ ) कळंबकडून मंचरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा दुचाकीवरून कळंबकडे चालला होता. तो मंचरला असताना वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला. त्यावर फोन उचलून मी दहा मिनिटात आलो असे त्याने सांगितले. मात्र बराच वेळ होऊनही तो आला नाही. तेव्हा त्याच्या आजोबांनी स्वतः त्याला फोन केला. त्यावर तो म्हणाला, तुम्ही जेवायला बसा, मी लगेच येतो. त्यावर आजोबांनी फोन बंद केला. घरातले जेवायला बसले असतानाच अवघ्या दहा मिनिटाच्या कालावधीतच त्याच्या मृत्यूची बातमी भालेराव कुटुंबाला मिळाली. त्यांना काय करावे, सुचेनासे झाले. मात्र सत्य स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता.
ओमच्या घरात आई, वडील, आजोबा, बहीण असा परिवार आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय शेती आहे. ओमच्या जाण्याने मात्र संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. त्यांना भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती हा ओमच्या आठवणींना उजाळा देत आहे. कुटुंबीय ओमच्या आठवणीने व्याकूळ झाले आहे. ओमच्या मृत्यूने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.