महायुतीतला मोठा भाऊ असलेला भाजप राज्यातील २८८ पैकी १५५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. शिंदेसेनेला ६० ते ६५ जागा मिळू शकतात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ सुटू शकतात. महायुतीमधील लहान पक्षांना १५ जागा सोडल्या जाऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेला ८० ते ९० जागांची मागणी केली आहे. तर शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणातून १०० जागांची मागणी केली. जागावाटपास झालेला उशीर, त्यामुळे उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंब, जाहीर केलेले उमेदवार बदलले गेल्यानं शिवसेनेचं नुकसान झाल्याचं कदम म्हणाले. त्यांनी मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला.
महायुतीच्या जागावाटपाच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी भाष्य केलं. ‘माझ्या माहितीनुसार अजित पवार गटाची बैठक झाली. अजित पवार गटातील अर्ध्यापेक्षा अधिक आमदारांनी महायुतीत बाहेर पडण्याची भूमिका मांडली आहे,’ असा दावा दानवेंनी केला. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अजित पवारांचा पक्ष एकटा पडल्याचं चित्र दिसत आहे. संघाच्या मुखपत्रानं राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर टिकेची झोड उठवली. तर शिंदेसेनेनंही आपल्या उमेदवारांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याचा नेमका काय फायदा झाला, असा प्रश्न भाजप, शिंदेसेनेचे नेते अंतर्गत बैठकांमध्ये विचारत आहेत.