आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून, लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे प्रकारही सध्या सुरू आहेत. भाजपच्या राज्यस्तरावरील बैठकीत मित्रपक्षांची कुठे कुठे मदत झाली नाही, याबाबत भाजपच्या नेत्यांनी तक्रारींचा सूर आळवला आहे. त्याच वेळी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्याशी शनिवारी रात्री चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
भाजप अधिवेशन
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन उद्या, रविवारी (२१ जुलै) बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे होत आहे. राज्यभरातील प्रमुख पाच हजार ३०० पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचा समारोप शहा यांच्या उपस्थितीत होणार असला, तरी ते पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आज, शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ‘महायुती’ची कामगिरी अत्यंत सुमार झाली. या धर्तीवर भाजपचे पुण्यात होणारे अधिवेशन हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा तडका
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी मदत झालेली नाही. या सर्व तक्रारी दोन्ही बाजूंनी होत असताना राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचीही चर्चा रंगली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे गेल्या आठवड्यात दिल्लीवारी केली. या सर्वांनी शहा यांची भेट घेऊन या घडामोडींबाबत चर्चा केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शहा यांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून घेण्यात येणारी भेट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
शहांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींचा लोकसभेच्या निवडणुकीत तोटा झाल्याची भाजपची धारणा आहे. त्यासाठी राज्यभर संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेची तयारी करायची, याबाबत अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. शहा हे कोणती भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.