लोकसभेत पराभूत, आता राज्यसभेवर संधी? सुनेत्रा पवारांबद्दल तिरकस प्रश्न येताच भुजबळ म्हणतात..

मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात दीड लाख मतांनी पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेवर संधी दिली आहे. लोकसभेतील पराभवाला १० दिवस उलटत नाहीत तोच राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यांनी विधिमंडळात जाऊन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या कुटुंबाला देण्यात आलेल्या झुकत्या मापाबद्दल विचारलं असता, हा निर्णय पक्षाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या निर्णयावर मी नाराज नाही. माझ्या चेहऱ्यावर कुठे नाराजी दिसतेय का, असा प्रतिप्रश्न भुजबळांनी पत्रकारांना केला.

अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीनं लोकसभेची उमेदवारी दिली. निवडणूक त्या पराभूत झाल्या. त्यानंतर लगेचच त्यांना राज्यसभेवर संधी दिली जातेय. अजित पवार कुटुंबात सगळी पदं देत आहेत. हे योग्य वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांकडून भुजबळांना विचारण्यात आला. ‘अजित पवारांनी कुठे काय म्हटलं? पक्षाच्या मंत्र्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्हा सगळ्यांचा आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
सुपरहिट फॉर्म्युला मविआकडून रिपीट; विधानसभा जिंकण्यासाठी प्लान ठरला, महायुतीला पुन्हा धक्का?
राजकीय पक्षात सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात. मी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत काम केलं आहे. सगळीकडे मी हीच गोष्ट शिकलो. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. पक्ष निर्णय घेत असतो. तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. माझ्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला मी अपक्ष थोडीच आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे वागावं लागतं. काही निर्णय घ्यावे लागतात, असं भुजबळांनी सांगितलं.
एका बाबूंचा शपथविधी, दुसरे बाबू गैरहजर; नितीश गेले कुणीकडे? किंगमेकरच्या अनुपस्थितीची चर्चा
राज्यसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा होती. पण तुम्ही ज्येष्ठ असूनही तुम्हाला डावलण्यात आलं. अजित पवारांच्या पत्नी आणि लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली. याबद्दल नाराज आहात का? असा प्रश्न भुजबळांना विचारला गेला. त्यावर माझ्या चेहऱ्याकडे पाहून मी नाराज आहे असं वाटतंय का, असा प्रतिप्रश्न भुजबळांनी केला.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघात पराभूत झाल्या. बालेकिल्ल्यात पत्नीचा पराभव झाल्यानं अजित पवारांवर मोठी नामुष्की ओढावली. अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव मावळमध्ये २ लाखांहून अधिक मतांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून हरले होते.