शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळपट्ट्या असून क्रिकेटचे सराव आणि सामने होतात. तसेच फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात येतात. मैदानातील माती मोठ्या प्रमाणात उडाल्याने त्याचा मोठा त्रास स्थानिकांना होतो. नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने मुंबई महापालिकेने मैदानातील हिरवळ कायम ठेवणे, धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे यासाठी शिवाजी पार्कचे नूतनीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने साधारण नऊ वर्षांपूर्वी घेतला होता.
त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल माती टाकली होती. या मातीवर पाण्याची फवारणी करणे आणि हिरवळ फुलवण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला. मात्र प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झालाच नाही. त्यामुळे मैदानातील माती उडून ती धूळ परिसरातील रहिवाशांच्या घरात जाऊ लागली.
महापालिकेने शिवाजी पार्कमधील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मैदानातील हवेत उडणारी माती व्हॅक्यूमच्या सहाय्याने ट्रकमध्ये जमा करण्याचा प्रयोग सुरू केला. सकाळी ११ वाजल्यापासून काम करताना दुपारपर्यंत हे काम सुरू केले. मागील दोन महिन्यांत साधारण २० ते २५ ट्रक मातीही काढण्यात आली आहे. परिणामी, धूळ प्रदूषण कमी होऊ लागले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
यासंदर्भात, सिटीझन फोरमचे सदस्य प्रकाश बेलवाडे, यांनी महापालिकेकडून सध्या करण्यात येणाऱ्या उपायामुळे शिवाजी पार्क मैदानातील माती उडून होणाऱ्या धूळ प्रदूषणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन आम्ही समाजमाधम्याद्वारे दादर शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनाही करत असल्याचे ते म्हणाले.