लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन
मध्य रेल्वेकडून प्रवाश्यांनाही सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या स्टंटमुळे स्टंट करणाऱ्यास तसेच इतर प्रवाशांच्या जीवाला देखील धोका होत असल्याने स्टंटबाजी न करण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
“प्रवाशांची सुरक्षा भारतीय रेल्वेसाठी सर्वात महत्त्वाची आहे. प्रवासासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करत राहू” असे मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ
इतरांनाही स्टंटबाजी करण्यापासून रोखा
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा धोकादायक कृत्यांमुळे प्राणघातक अपघात होऊ शकतात. त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर स्टंट करण्याचा प्रयत्न करण्यापासून अशा लोकांना इतरांनीही परावृत्त करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
सामान्य नागरिक आणि प्रवाशांनी 9004410735 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून अशा प्रकारच्या कोणत्याही गैरकृत्यांची तक्रार करण्यास मध्य रेल्वेने सांगितले आहे.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, “यापूर्वी ही अशाच काही तरुणांनी स्टंटबाजी केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यात काही जणांचा मृत्यूही झाला आहे आणि त्यानंतर कुटुंबीय रेल्वेला दोष देतात” मात्र अशा घटनांमधून जीवघेण्या कृत्यांतून संभाव्य गंभीर धोके अधोरेखित होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. झोपडपट्टी परिसरात जाऊन रेल्वेकडून समाज प्रबोधन करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.