पंकजा मुंडेंच्या गळ्यात विजयाची माळ, कुटुंब भारावले!
२६ मते पडत पंकजा मुंडेंचा विधान परिषदेवर दणदणीत विजय झाला. पंकजा मुडेंच्या विजयानंतर मुंडे समर्थक आणि मुंडे कुटुंबीय भावुक झालेले पाहायला मिळाले. बहिणीसाठी खासदारकी वर पाणी सोडणाऱ्या प्रीतम मुंडे बहीणीचा विजय पाहून गहिवरल्या, डोळ्यात आनंदाश्रू तरळु लागले. मुंडे समर्थकांनी विधानसभेच्या बाहेर एकच जल्लोष केला. पंकजा मुंडेंचा विजय पाहण्यासाठी कुटुंबीय विधान भवनाच्या प्रांगणात हजर होते. २०१४ साली पंकजा मुंडे विधानसभेवर गेल्या होत्या २०१९ साली विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजा यांचा पराभव केला, २०२४ लोकसभेत पुन्हा पंकजा यांच्या पदरात पराभव पडला पण अखेर दहा वर्षांनी विजयाचा गुलाल पंकजा यांना लागला.
पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष राज्यात मोठा करण्यासाठी पुर्ण मेहनत घेतली होती त्यामुळे मुंडेंच्या लेकीचा राजकीय वनवास राजकीय दृष्ट्या अनेकांच्या जिव्हारी लागणारा होता. याशिवाय मागील पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी राजकीय नाराजी उघड उघडपणे बोलत राज्यातील राजकारणावर भाष्य केले होते. भाजपकडून मागीलच्या काळात अनेक नव्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेत साठी उमेदवारी मिळाली मात्र पंकजा मुंडे यांना प्रतीक्षा करावी लागली. राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांना डावलून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आणि त्यांची निवड झाली मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले हीच बाब मुंडे समर्थकांना जिव्हारी लागली होती.