पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा दावा आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनी केला होता. लेकाला वाचवण्यासाठी बिल्डर बापानं केलेला दावा खोटा असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. आरटीओच्या प्राथमिक तपासातून ही बाब उघडकीस आली आहे. पुणे आरटीओकडून लवकरच या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करतील.
महागड्या पोर्शे कारची नोंद आरटीओकडे का केली नाही, असा सवाल पोलिसांनी विशाल अगरवालला चौकशी दरम्यान विचारला होता. तेव्हा कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याचं उत्तर अगरवालनं दिलं. यासाठी दिल्लीतील ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार दाखल केल्याचंही त्यानं सांगितलं होतं. पोलीस सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर पोर्शे कारचं मोठं नुकसान झालं आहे. पण त्यात कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नाही.
‘अपघातग्रस्त कार महागडी आहे. या इलेक्ट्रिक कारची निर्मिती परकीय कंपनीनं केली आहे. त्यामुळे पोर्शेमधील टेक्निकल एक्स्पर्टला कारच्या तपासणीसाठी बोलावण्यात आलं आहे. पण प्राथमिकदृष्ट्या तरी कारमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या दिसत नाही. पण पोर्शेच्या तंत्रज्ञासोबत समन्वय ठेवून आणखी काही बाबींची तपासणी गरजेची आहे. तो तंत्रिक लवकरच येईल,’ अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
या प्रकरणावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही. अपघातग्रस्त हाय एंड कारचं पोर्शेच्या तंत्रज्ञासोबत अधिक व्यवस्थितरित्या करता येईल, असं पुणे वाहतूक विभागाचे अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं. ‘आम्ही आताच काही तपशील जाहीर करु शकत नाही. पण प्राथमिक तपासणी झालेली आहे. याबद्दलचा अंतिम अहवाल दोन ते तीन दिवसांत येईल,’ असं भोर म्हणाले.