आमदार रोहित पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विद्यमान खासदारांना सेल्फी काढण्याशिवाय दुसरं काही काम नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती. याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, ‘अजितदादांची पूर्वीची भाषणे काढावी लागतील. त्या भाषणांमध्ये ते स्वतः म्हणाले आहेत की, सुप्रिया ताईंचे कार्य खूप मोठं आहे. चांगलं आहे. केंद्रात त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. हे सर्व यापूर्वी दादा बोलले आहेत. मात्र आता ते भूमिका बदलत असतील तर बदललेले दादा आम्ही बघितले नाही.’
‘पूर्वीचे आम्हाला माहिती असणारे दादा २०-२० हजारांची सभा गाजवायचे. मात्र आता भाजपकडे गेलेले दादा पाच पाच, सहा सहा लोकांच्या बैठका घेत आहेत. आता काय मोठं काय छोटं यापेक्षा भाजपने त्यांची ही परिस्थिती केली आहे. आम्ही त्यांना हेच सांगत होतो, की तुम्ही मोठे नेते आहात. तुम्ही महाराष्ट्रात फिरलं पाहिजे. मात्र भाजपने त्यांना लोकल नेता म्हणून बनवलं आहे. त्यामुळे त्यांना मधून मधून टेन्शन येत असावं.’
पळून जाण्यापेक्षा हे लढण्याचे दिवस…
कितीही तुम्ही दहशत केली, तरी लोकांचा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा असतो. आता लोकांना कळालं आहे. स्वाभिमान टिकवण्याची वेळ आली आहे. विचार जपण्याची वेळ आली आहे. पुढे बलाढ्य शक्ती असेल, दबाव तंत्र असेल. मलिदा गॅंग मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असेल. या गोष्टी असतानाही लोक म्हणतात की, आम्ही आमचं घर चालवत आहोत. आधीच्या पिढीने आम्हाला विचार दिले आहेत. संस्कार दिले आहेत. आम्ही पुढच्या पिढीला संस्कार देत आहोत.
अशातच आमच्यात कुटुंबात अशी वेळ आली असती की, एका व्यक्तीला मदत लागत आहे. तर आम्ही थोडीच पळून गेलो असतो. म्हणूनच पळून जाण्यापेक्षा हे लढण्याचे दिवस आहेत. म्हणून इथली जनता साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभी आहे. पलीकडे मलिदा गॅंग आहे. तर इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेते अशी ही लढाई आहे. साडेतीन – चार लाख मताच्या फरकाने सुप्रिया सुळे निवडून येतील, ही बघण्याची वेळ आली आहे.