अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता.
अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर आणि एकूणच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहित पवार यांचे समर्थक बऱ्यापैकी राम शिंदे यांच्याकडे गेल्याचं अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी अक्षय शिंदे हे रोहित पवार यांच्या सोबतच होते.
आता लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातच अजित पवार यांनी मोठी खेळी खेळत रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या अक्षय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देत रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे.
अक्षय शिंदे हे धनगर समाजातील एक मोठे नेतृत्व म्हणून संपूर्ण नगर जिल्ह्याला परिचित आहेत. धनगर समाजातील युवकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा फायदा अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात देखील होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धनगर समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी दोन्ही पवारांमध्ये चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांचा अर्ज भरण्याच्या दिवशी शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले भूषणसिंहराजे होळकर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर भूषणसिंहराजे होळकर यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार सभा देखील होत आहेत. त्याचा फटका हा अजित पवार यांना होत असून हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि धनगर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
इतकंच नाही तर अक्षय शिंदे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे थेट प्रदेश उपाध्यक्षपद बहाल केले आहे. त्यामुळे अक्षय शिंदे यांना प्रवेश देत अजित पवार यांनी एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर मतदारांना आकर्षित करण्यासाठी खेळी खेळली असून दुसरीकडे रोहित पवार यांना देखील जोरदार धक्का दिला आहे.