रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे ते अयोध्या धावणार अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी, पुणे : पुण्यातून आयोध्येला दर्शनासाठी जाण्यासाठी रेल्वेने तीन आणि सात मे रोजी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रामलल्ला दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आयोध्येत राम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर देशभरातून दर्शनासाठी भाविकांची दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: रेल्वेने हजारो भाविक अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्यादरम्यान अतिरिक्त चार उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-अयोध्या (ट्रेन क्रमांक ०१४५५) उन्हाळी विशेष गाडी पुण्याहून तीन आणि सात मे या दोन दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ती तिसऱ्या दिवशी अयोध्येत सकाळी ८.५० वाजता पोहोचणार आहे. अयोध्या-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४५६) उन्हाळी विशेष गाडी अयोध्येहून पाच मे आणि नऊ मे रोजी दुपारी चार वाजता सुटणार आहे. ती तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३.५५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर आणि लखनौ या स्थानकांवर थांबे असणार आहेत.
पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अ‍ॅलर्ट’! उष्णतेच्या लाटेमुळे लाहीलाही; कमाल तापमान ४१ अंशांपुढे
पुणे ते अजनी एकेरी विशेष गाडी

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते अजनीदरम्यान अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन मे रोजी पुण्याहून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता अजनीला पोहोचेल.