रिफायनरीचा विषय बंद होईपर्यंत आंदोलन चालूच, बारसु रिफायनरीविरोधकांची स्पष्ट भूमिका

प्रतिनिधी, मुंबई : कोकणातील स्थानिकांना शाश्वत विकासाची अपेक्षा असून हानिकारक उद्योगांपेक्षा निसर्ग जपून उद्योगविकास अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये विखुरलेल्या कोकणवासींसह तळकोकणातील स्थानिकांपर्यंत सर्वत्र, रिफायनरीविरोध मतपेटीतून दिसून यावा, यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. कोकणामध्ये कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला, तरी रिफायनरीचा विषय कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असे बारसु रिफायनरीविरोधक आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले.

बारसु रिफायनरीविरोधक नव्या जोमाने आंदोलनाची बांधणी करत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी पंचक्रोशीतील गावागावांमध्ये जाऊन आंदोलनाची पुढील तयारीही सुरू झाली आहे. महायुतीने रिफायनरीचा आग्रह कायम ठेवल्याने महाविकास आघाडीतर्फे कोकणात २८ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेमध्ये कोणती जाहीर भूमिका घेतली जात आहे, याकडेही कोकणवासींचे लक्ष आहे. रिफायनरीला विरोध, पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या उद्योगांना विरोध हा केवळ रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित नसून सिंधुदुर्गातही याची चर्चा असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पालकांची ‘स्मार्ट स्कूल’ला पसंती; मनपा शाळांमध्ये प्रवेश नोंदणी मोहीम, शिक्षणाचा दर्जा उंचावणार
कोकणामध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिकडेच धोपेश्वर येथील गुरववाडी, गिरमादेवीचा कोंड येथील ग्रामस्थांची बैठक घेतली. रिफायनरी, पेट्रोकेमिकल प्रकल्पांचे समर्थन करणाऱ्यांना तसेच आंदोलकांवर दडपशाही करणाऱ्यांना मतदान करू नये, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये रिफायनरीविरोधक स्वतःचा उमेदवार उतरवू शकतील, अशी चर्चा होती. मात्र ही शक्यता आता कमी असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत अधिकाधिक संख्येने मतदान व्हावे, यासाठीही रिफायनरीविरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. मतटक्का वाढला तर हा विरोधही मोठ्या संख्येने दिसून येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.