लोकसभा निवडणूक निकालांत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस पक्षाला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिल्याने राहुल गांधी यांचे महाराष्ट्राकडे अधिकचे लक्ष आहे. तसेच पुढील चार महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. अशावेळी महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते-पदाधिकारी कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी राहुल यांचा आषाढी वारीतील सहभाग मोठा परिणाम करणारा असू शकतो, असे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकांआधी राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी पायी भारत जोडो यात्रा करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, दीन दलित, गोरगरिबांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच दुसऱ्या टप्प्यात भारत जोडो न्याय यात्रा करून एकप्रकारे संपूर्ण भारत पिंजून काढला. काँग्रेस पक्षाला राहुल गांधी यांच्या यात्रेचा मोठा फायदा झाल्याचे लोकसभा निवडणूक निकालांतून दिसून आले. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक समीप आलेली असताना राहुल यांचा आषाढी दौरा काँग्रेस पक्षासाठी निश्चित नवसंजीवनी देणारा ठरेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या बड्या नेत्याने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
शरद पवारही वारीत चालणार
आषाढी वारी हा खरे तर महाराष्ट्राचा लोकोत्सव… आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या धर्म, संस्कृती आणि परंपरेचा शिखराध्याय. आध्यात्मिकतेबरोबरच वारीमध्ये समतेचा विचार खोलवर रुजविण्यासाठी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या उपक्रमात सहभागी होऊन वारीत पायी चालणार आहेत.