कोकण पदवीधर मतदारसंघ आमचा हक्काचा आहे. निरंजन डावखरे यांची ही सीटिंग जागा आहे. भाजप निवडणूक लढवणार, मनसेला शुभेच्छा, असं आशीष शेलारांनी म्हटल्यामुळे मनसेच्या पाठीत मित्रानेच खंजीर खुपसल्याची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरेंना हिरीरीने सहभागी करुन घेतल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील केवळ एका जागेसाठीही भाजप मनसेला पाठिंबा देणार नाही का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निरंजन डावखरे हे विधानपरिषदेवर आमदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. अशातच भाजपच्या गडात मनसेने उमेदवार उतरवण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी अचानक केली.
सुरुवातीला पानसे हे मनसेचे उमेदवार आहेत, की महायुतीचे याबाबत संभ्रम होता. मात्र लोकसभेत बाहेरुन पाठिंबा देऊनही ‘आतून’ प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंना भाजप कसा विरोध करेल, असा एक मतप्रवाह समोर आला होता. राज ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार दिल्यास भाजपने केवळ त्यांचा वापर करुन घेतल्याचं चित्र निर्माण होईल. लोकसभेचं मतदान झालं असलं, तरी भाजपलाच भविष्यात त्याचा फटका बसेल, अशी चर्चा होती. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला भाजपही बिनशर्त पाठिंबा देईल, असं मानलं जात होतं.
दुसरीकडे, राज ठाकरेही उमेदवार घोषित करुन भाजपच्या मनात काय चाललंय, याची चाचपणी करत असल्याची चर्चा होती. म्हणजे आगामी विधानसभा, महापालिका यांच्या जागावाटपाचा कुठलाच अधिकृत करार झाला नसताना, आपला मित्र आपल्या मदतीला येणार का, हे राज ठाकरे पडताळून पाहत असल्याचं बोललं जात होतं. मात्र राज ठाकरे ज्यांना जवळचा मित्र मानतात, त्या शेलारांनीच मनसेविरोधात उमेदवार देण्याची भूमिका घेतल्याने महायुतीत सारं आलबेल नसल्याचं चित्र आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
एकीकडे, अभिजीत पानसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी ठाणे-कल्याण येथील शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची परतफेड शिंदे मनसेला पाठिंबा देऊन करु शकतात. मात्र मुंबईतील प्रचारसभेसाठी अख्खं मैदान बुक करणाऱ्या, प्रोटोकॉल मोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी भाषण करण्याची संधी मिळालेल्या राज ठाकरेंचं महत्त्व भाजपसाठी अचानक मतदानानंतर कमी झालंय का, अशीही चर्चा आहे.
आता भविष्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगणार, भाजप माघार घेत डावखरेंचं तिकीट कापणार आणि राज ठाकरेंच्या उमेदवारा पाठिंबा देणार की मनसेवर यूटर्नची नामुष्की पुन्हा ओढवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.