राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही : शरद पवार

बारामती : केंद्र आणि राज्य सरकार आज आमच्या हातात नाही. कालच्या निवडणुकीला जसे तुम्ही काम केले तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीला केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही ते मी बघतोच, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही, असेही पवार म्हणाले.

शरद पवार तीन दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. येथील ग्रामीण भागांत जाऊन दुष्काळग्रस्त नागरिकांच्या व्यथा ते समजावून घेत आहेत. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर येथील नागरिकांच्या दुष्काळी प्रश्नांसंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिले आहे. बुधवारी त्यांची बारामतीच्या नीरावागजमध्ये छोटेखानी जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी बारामतीच्या ग्रामीण भागांतील जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
Sharad Pawar: ऊसाला भाव कसा मिळत नाही, दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत, हे सगळं बघतो; मला बघण्याचा फार अनुभव आहे- शरद पवार

राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही

नीरावागज येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला. दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच शेतीसमोरील आव्हाने असे विविध मुद्दे नागरिकांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवले. त्यानंतर केलेल्या संबोधनात पवार म्हणाले, “आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण कालच्या (लोकसभा) निवडणुकीत जसे आपण केले तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही, तेच मी पाहतो. एकदा का राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही”
Baramati News: ‘लोकसभेला जसं काम केलं, तसंच विधानसभेला करा’; शरद पवारांची बारामतीकरांना साद

मी तुमच्या पाठीशी, आपण एका विचाराने राहू

पुढे बोलताना पवार म्हणाले, नेत्यांनी काही केलं नाही, पण मी तुमच्या पाठीशी उभा राहणार असून आपण एका विचाराने राहून हे दुरुस्त करू, असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

केंद्र आणि राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

शेतकरी प्रश्नांसंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या देखील कानांवर हे प्रश्न घातले आहेत. त्यांनी निर्णय घेतला तर आनंदच आहे. पण जर निर्णय घेतला नाही तर लोकशाहीमध्ये जनतेच्या जोरावर योग्य पद्धतीने काय सांगायचे हा मार्ग आम्हाला माहिती आहे, असा इशाराही पवार यांनी मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.