शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ससाणेनगर येथे झाला. माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर नीलेश मगर, प्रवीण तुपे, पुणे शहर शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.
शिवरकर म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केल्याने अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले आहे.’ योगेश ससाने म्हणाले, ‘खासदार कोल्हे यांनी हडपसरमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा. महापालिका आयुक्तांशी समन्वय साधल्याने नागरिकांचे प्रश्न सुटतील.’
अमोल कोल्हे शिरूरमधून दुसऱ्यांदा विजयी
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा विजय साकारत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती, तर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. डॉ. कोल्हे यांच्या विजयामुळे तुतारीचा आवाज पुढील पाच वर्षे शिरूर मतदारसंघात घुमणार आहे.