काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक बडेनेते उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात वरील मागणी केली.
या भेटीनंतर नाना पटोले म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते तर काही मंत्री परदेशात गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती, ह्याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्याला आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरु आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्या
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरु केलेले आहे, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, असे नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी यावेळी केली आहे.