राज्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे ८६ बळी तर १३१ जण जखमी, आतापर्यंत ५१६.१ मि.मी. पावसाची नोंद

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत एकूण ८६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १३१ जण जखमी झाले आहेत. तर या पावसामुळे राज्यात पाच जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्कालीन परिस्थिती अहवालातून समोर आली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत २४.१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.राज्य सरकारतर्फे रविवारी राज्य आपत्कालीन परिस्थिती अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार वरील बाब समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात १५ मेपासून ते रविवारपर्यंत ५१६.१ मि.मी इतक्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या या पावसामुळे आतापर्यंत ३०२ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २१ घरांचे नुकसान झाले असून २४१ जणांना सुरक्षित हलविण्यात आल्याची माहिती या अहवालानुसार समोर आली आहे. गेल्या २४ तासांत २४.१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या चोवीस तासांत घर कोसळल्यामुळे एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर एकजण बेपत्ता असून एका प्राण्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Rain News: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान! नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

सर्वाधिक बळी मुंबई शहरात

या अहवालानुसार मुंबई शहरात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरात चार जणांचा तर पुणे जिल्ह्यात सहा जणांच्या मृत्यूची नोंद १५ मे ते २० जुलै या कालावधीत नोंदविण्यात आली आहे. लातूर येथे सात जणांचा, नागपूर येथे सहा आणि यवतमाळ येथे पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पालघर आणि ठाण्यात एनडीआरएफचे पथक

मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्यात आले आहेत. यात पालघर, ठाणे, रागयड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आल्या आहेत. तर गडचिरोली आणि नांदेड येथे एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग कोल्हापुरात अतिवृष्टी

राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, पालघर, गडचिरोली, नाशिक, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंडिया आणि अकोला या जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ६४.५ ते ११५.५ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.