शरद पवार काय म्हणाले
“पीएम मोदींनी ज्या मतदारसंघात रोड शो आणि प्रचारसभा घेतल्या त्या ठिकाणी आम्ही जिंकलोय, त्यामुळे मला वाटते माझे कर्तव्य आहे पीएम मोदींचे आभार मानणे, मोदींमुळे महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले” असे म्हणत मोदींचे भरसभेत शरद पवारांनी आभार मानले.
महाराष्ट्रात भाजपला यंदाच्या लोकसभेत मोठा फटका बसलाय. २०१९ च्या विधानसभेनंतर राज्यात राजकीय गणिते बरीच बदलली, त्यामध्ये सेना आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरणे आणखी बदलेली दिसली, त्यामुळे बंडखोरीनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असे चित्र दिसले. राज्यात ४८ जागांपैकी भाजपला फक्त ९ जागांवर यश मिळाले.
निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या निकालानुसार यंदा भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मित्रपक्षांच्या साह्याने भाजपाने एनडीए सरकार स्थापन केले. राज्यातील ४८ जागांपैकी १८ जागांवर मोदींनी प्रचारसभा घेतल्या पण १५ जागांवर भाजपला यश मिळवता आले नाही. हाच विषय पकडून पवारांनी धन्यवाद मानत मोदींना अपयशाच्या मुद्द्यावरुन डिवचले.
बंडखोराना परत घेणार?
पत्रकार परिषदे दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बंडखोरांना तुम्हीही परत घेणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवार आणि ठाकरेंनी एकसूर मिसळत आता बडखोरांना पुन्हा घेणार नाही अशी ग्वाही दिली. तर विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असे पवार आणि ठाकरेंनी एकत्र सांगितले. लवकरच जागावाटप होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना माहिती दिली.