राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी भाजपामध्ये खांदेपालट
भडकाऊ, चिथावणीखोर आणि समाज विघटित करणारे वक्तव्ये महाराष्ट्रात पेरण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळ दुपार संध्याकाळ वक्तव्ये देणाऱ्या लोकांची यादी तयार केली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी भाजपाने खांदेपालट करत आता नव्या लोकांना जबाबदारी दिली आहे, अशा शब्दात भाजपच्या नव्या यादीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
त्यांचे प्रभावक्षेत्र क्षीण झालंय, याची भाजपला खात्री पटलीये
कदाचित नितेश राणे, निलेश राणे, चित्रा वाघ, नवनीत राणा ही मंडळी नुसतीच कर्णकर्कश ओरडतात. मात्र यांचे प्रभावक्षेत्र अगदीच क्षीण झाले आहे, याची खात्री भाजपाला सुद्धा पटली आहे. म्हणूनच की काय आता सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची जबाबदारी भाजपाच्या या नव्या लोकांना दिली आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचेही भाजपच्या यादीत नाव
दुसरीकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा अधिकृतरित्या भाजपच्या लेटरहेडवर दिसत आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव अॅड अनिकेत निकम यांचेही नाव भाजपच्या यादीत दिसत असल्याने सुषमा अंधारे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निकम हे पहिले विशेष सरकारी वकील असतील जे राजकीय पक्षाची भूमिका मांडतील. जे लोक संविधान बदल करणार नाही असे म्हणतात, तेच लोक आपल्या कृतीतून कायदा कसा मोडत आहेत, तेच आपल्याला दिसते, असे अंधारे यांनी म्हटले.