राज्याचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून, ‘या’ दिवशी मांडणार अर्थसंकल्प, किती दिवस चालणार?

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत चालवण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. या अधिवेशनात २८ जून रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. पहिल्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारीही कामकाज होणार असून, त्यानंतरचे दोन आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २७ जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता या पावसाळी अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्पाच्या निमित्ताने महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीच्या आमदारांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्यामुळे या अधिवेशनात त्यांची रणनीती काय असेल, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.