राज्यसभेवर कोण? सुनेत्रा पवार की पार्थ पवार? दादांचा निर्णय झाला; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरु आहे. रिक्त असलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं होतं. एका जागेसाठी अजित पवारांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची नावं चर्चेत होती. यातील एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा करतील.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवावं अशी मागणी राष्ट्रवादीतून केली जात होती. पक्षाच्या आमदारांनी याबद्दल एक पत्र नेतृत्त्वाला दिलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. बारामतीत नणंदेकडे पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली जाईल.
‘ती’ खुर्ची अतिशय महत्त्वाची, २५ वर्षांपूर्वी भाजपचा घात झालेला; मोदी पुन्हा रिस्क घेणार?
बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला. त्यात सुनेत्रा पवार जवळपास दीड लाख मतांनी पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर संधी देण्याची मागणी जोर धरु लागली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये लोकसभेत पराभूत झालेल्या पार्थ पवारांच्या नावाचीही चर्चा राज्यसभेसाठी होती. ते फेब्रुवारीपासूनच राज्यसभेसाठी प्रयत्नशील होते. पण आता पक्षानं त्यांच्याऐवजी त्यांच्या आईला राज्यसभेवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवारांची वर्णी लागेल. पटेल २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर पक्षानं त्यांना फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा राज्यसभेवर संधी दिली. त्यामुळे त्यांनी आधीची खासदारकी सोडली. त्या खासदारकीचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ ४ वर्षांचा असेल. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली जात असल्यानं आता पार्थ पवारांचं काय होणार हा प्रश्न कायम आहे.