लोकसभेत बारामती मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करण्यात येत होती. बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. परंतु, बैठकीत १३ नावांवर चर्चा करण्यात आली. यात छगन भुजबळ, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी, पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, अखेर सुनेत्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली.गुरुवारी सुनेत्रा यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यास छगन भुजबळ हजर होते. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी आपणही राज्यसभेसाठी इच्छुक होते, हे जाहीर केले. पक्षात माझ्यासह अनेकांची इच्छा होती. पण, १३ जणांना तर उमेदवारी मिळू शकत नाही, म्हणून अखेर एक नाव अंतिम करण्यात आले. पक्षात राहताना असे निर्णय स्वीकारावे लागतात, परंतु, सर्वांच्या मनासारखे होत नाही, एखादा निर्णय घेतला की तो मान्य करावा लागतो, अशी सारवासारव त्यांनी केली.
दरम्यान, ऑर्गनायझरमध्ये भाजपने राष्ट्रवादी पक्षालासोबत घेतल्याने नुकसान झाल्याच्या लेखावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की, लेखात अनेकांवर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते का पक्षात घेतले अशीही टीका आहे, भाजपने काँग्रेसमधून अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना घेतले त्यांना पदही दिले. एकनाथ शिंदे यांनाही सोबत घेतले, त्यामुळे लेखातील टीका बरोबर आहे, असा निर्वाळा भुजबळ यांनी दिला. पण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या इतर राज्यांत काय झाले, इतर ठिकाणीही पिछाडी झाली ना, म्हणूनच नितिश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले, असेही स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.