खडतर राजकीय प्रवास
पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणातील प्रवास काहीसा खडतर राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून त्या महायुतीतर्फे भाजप उमेदवार होत्या. परंतु महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजांना पराभवाची धूळ चारली.
दोन वेळा पराभवाचा धक्का
याआधी, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून बंधू धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीच नाही. दोन वेळा खासदार राहिलेल्या बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत भाजपे पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं होतं, मात्र ते राखण्यात त्यांना यश आलं नव्हतं.
केवळ चर्चाच
दरम्यानच्या काळात विधानपरिषद असो किंवा राज्यसभा, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची केवळ चर्चा होत असे, मात्र त्यांना एकदाही उमेदवारी मिळाली नव्हती. २०१९ च्या विधानसभेला सुरु झालेला त्यांचा राजकीय संन्यास कायम राहिला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद सांभाळले आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. १२ जुलै रोजी रोजी मतदान असून त्याच दिवशी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहेत.
पराभूत बड्या नेत्यांपैकी केवळ पंकजांना संधी
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार आणि महादेव जानकर यांनाही विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. याशिवाय हर्षवर्धन पाटील, निलय नाईक, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांच्या नावांचीही चर्चा होती.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची रणनीती मविआ नेत्यांनी आखली असून त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. रिक्त जागांपैकी महायुतीकडे नऊ, तर महाविकास आघाडी दोन जागा निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. परंतु महाविकास आघाडी तिसरा उमेदवार उतरवून गुप्त मतदानाचा फायदा उचलण्याची चिन्हं आहेत.