या मॅरेथॉन बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, आमदार विद्या ठाकूर आदी उपस्थित होते. या बैठकीत फडणवीस यांनी येथील प्रचाराचा आढावा घेतला. या बैठकीला भाजपचे सर्व स्थानिक नगरसेवक आणि रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या बैठकीत भाजपचे सर्व नेते, अधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवून या जागेवर जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी जागृती करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आमदार अमित साटम यांनी यावेळी सांगितले.
यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्याविरोधात आरोप केले आणि आता त्यांच्यासाठी कशी मते मागणार ? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी फडणवीसांना विचारण्यात आला होता. शिवसेना आता आमच्यासोबत आली असून, त्यांच्या पक्षात त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. महायुतीत ज्या पक्षाचा उमेदवार त्याचा आम्ही प्रचार करणार. यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचाही प्रचार करणार. मात्र आम्ही जे लढतोय ते कोणाच्या विरोधात लढतोय ते पाहणे महत्त्वाचे आहे.
आम्ही त्यांच्या म्होरक्यांच्या विरोधात लढतोय. हे असतीलच तर प्यादे असतील, मात्र ते ज्यांच्या इशाऱ्यावरून काही करीत होते, त्यांच्याच विरोधात आम्ही लढा देतोय. महापालिका कोण चालवत होते? आदेश कोणाचे होते? आम्ही यांच्यावर नव्हे तर त्यांच्या प्रमुखांवरच आरोप केले असून, त्यांचा आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असं उत्तर देवेंद्र यांनी दिलं होतं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कीर्तिकरांसाठी आज ठाकरेंची रॅली
या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनीही दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढण्यात येणार असून उद्धव ठाकरेही या रॅलीत सहभागी होणार आहेत. अंधेरी-कुर्ला रोड येथून ही रॅली सुरू होणार असून रामवाडी प्रताप नगर येथे या रॅलीचा समारोप होणार असल्याचे अमोल कीर्तिकर यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.